भिवंडीत मनपाच्या घंटागाडीने सहा वर्षीय मुलाला चिरडले

भिवंडी- भिवंडी शहरातील सलामतपुरा परिसरात मनपाच्या घंटागाडीने एका सहा वर्षीय मुलाला चिरडल्याची दुर्घटना समोर आली आहे. रोहित विजय लोंढे (6) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

घटनेनंतर स्थानिकांनी घंटागाडी चालकाला बेदम चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र स्थानिकांनी तसेच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला.

घटना घडली त्यावेळी मुलाचे वडील जेवण करण्याकरिता बाहेर गेले होते. त्यांच्या शोधात मुलाची आई आपल्या मुलासह बाहेर पडली होती. मात्र रस्त्यातच मागून येणाऱ्या घंटागाडीने त्यांचा रोहितला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर स्थानिकांनी घंटागाडी चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मात्र स्थानिक तसेच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्याची समजूत घालून त्यांना शांत केले.

घंटागाडी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घंटागाडी चालकाकडे वाहनाचा परवाना देखील नाही. महापालिका विनापरवाना घंटागाड्या चालवत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)