पिंपरी -पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ज्येष्ठ नेते भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी बॉलिंग केली. यावेळी बॅट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात होती. पाटील यांनी लांडे यांच्या बॉलिंगवर सणसणीत षटकार ठोकला.
राजकीय डावपेचात पटाईत असणारे नेते खेळातही मागे नसल्याचा प्रत्यय भोसरीकरांना आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त मोशीत योध्दा 83 या सोसायटी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेला प्रदेशाध्यक्ष पाटील आणि लांडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी लांडे आणि पाटील यांनी क्रिकेटचे मैदानही मारले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, आतिश बारणे आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील बॅट घेवून मैदानात आले असता बॉलिंग करायला माजी आमदार लांडे उतरले. लांडे यांनी टाकलेल्या बॉलिंगला पाटील त्यांनी सणसणीत असा षटकार मारला. खेळात असो वा राजकारणात संधी आली की सोडायची नसते, असा संदेशचा पाटील यांनी यावेळी दिला.