पॅलेस्टाईनसारखी स्थिती निर्माण होण्याचा मेहबुबांचा इशारा 

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्याच्या निर्णयावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी थेट पॅलेस्टाईनसारखी स्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे.
जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय म्हणजे राज्यातील जनतेला दडपण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. राज्याची अर्थव्यवस्था आणि जनतेच्या मूलभूत हक्कांवरील तो घाला आहे.

जनतेने ती बंदी झुगारून द्यावी. जम्मू-काश्‍मीर आणि केंद्र सरकारमधील संबंध इस्त्रायल-पॅलेस्टाईनसारखे नाहीत. मात्र, आपले संबंध इस्त्रायल-पॅलेस्टाईनसारखे व्हावेत असे केंद्र सरकारला वाटत असेल तर पॅलेस्टाईनसारख्या स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहावे, असे मेहबुबा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. महामार्ग बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात जम्मू-काश्‍मीरमध्ये राजकीय पक्षांकडून निदर्शने सुरू आहेत. मात्र, त्या निर्णयाचे केंद्रीय गृह मंत्रालयाने जोरदार समर्थन केले आहे. आठवड्यातील केवळ दोन दिवस प्रत्येकी 12 तास महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. सुरक्षा दलांच्या सुरक्षित प्रवासासाठी तो निर्णय घेण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. तो निर्णय 3 एप्रिलला लागू करण्यात आला. त्यानुसार, 31 मेपर्यंत दर रविवारी आणि बुधवारी नागरी वाहतुकीसाठी महामार्ग 12 तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.