श्रीगोंदा : महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा शिवसेनेकडे गेली. माजी आमदार राहुल जगताप व घनश्याम शेलार यांच्यावर अन्याय झाला. माजी आमदार राहुल जगताप हे भविष्यात शहराच्या विकासासाठी सहकार्य करतील,
हा आम्हाला विश्वास असल्याने विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांना पाठिंबा देणार असल्याची भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी मांडत काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे आणि नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी गुरुवारी(ता.७) सकाळी पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. पोटे दाम्पत्याच्या भूमिकेने श्रीगोंद्यात महाविकास आघाडीला धक्का बसला असून त्यांच्या या निर्णयाने श्रीगोंदा शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा शिवसेनेकडे गेली. त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले मनोहर पोटे आणि नगराध्यक्षा शुभांगी पोटे या दाम्पत्याने समर्थकांची बैठक घेत माजी आमदार राहुल जगताप यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राहुल जगताप व मनोहर पोटे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत जगताप यांना आमदारकीच नव्हे तर त्यांना लालदिवा मिळावा, अशी शुभेच्छा देत पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी जेष्ठनेते केशवराव मगर, बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, सुभाष काळाणे, राजकुमार पाटील, दीपक भोसले, अजित जामदार, उत्तम डाके, सतीश कसरे, पांडुरंग पोटे आदी उपस्थित होते.