पुणे : पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात (पुणे बोर्ड) लाखो रुपये खर्च करून सोलर यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, या यंत्रणेला कनेक्टीव्हिटी देण्यासाठी अद्यापही मुहूर्त न मिळाल्याने दरमहा सव्वादोन लाख रुपयांचा वीजबिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
राज्य मंडळाच्या पुढाकाराने व नियंत्रणाखाली पुणे बोर्डाच्या इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. १८ कोटी रुपये खर्चूनही सुशोभीकरण अर्धवटच असे वृत्त दै. प्रभातच्या ४ डिसेंबर २०२४ रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर राज्य मंडळ खडबडून जागे झाले आहे. राज्य मंडळाने तात्काळ पुणे बोर्डाकडून सुशोभीकरणाच्या कामासह प्रलंबित कामांची यादीच मागवली आहे. त्यावर पुणे बोर्डातील अधिकारी यांनी प्रलंबित कामांची यादी तयार करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. सुशोभीकरणासाठी ११ कोटी रुपयेच खर्च केल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले. या कामात लिफ्टच्या कामाचा समावेश नसल्याचेही राज्य मंडळाचे म्हणणे आहे.
दरम्यान, सुशोभीकरणाच्या कामाअंतर्गत वीजबिल बचतीसाठी सोलर यंत्रणा बसवली आहे. मात्र, ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडली असून, सोलर यंत्रणेला कनेक्टीव्हिटी दिलेली नसल्याने अद्यापही यंत्रणा बंदच आहे. पुणे बोर्ड वीजबिलासाठी दरमहा सव्वादोन लाख रुपये खर्च करत आहे. सोलर यंत्रणा कार्यान्वित झाली असती, तर पुणे बोर्डाचे गेल्या काही महिन्यांतील लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान टळले असते.
पुणे बोर्डाच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्याचा ठेका एका ठेकादाराला देण्यात आला होता. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा विचार करता पुणे बोर्डात तेवढी कामेच झाल्याचे आढळत नाही. बहुसंख्य कामे अर्धवटच पडली आहेत. सुशोभीकरणाच्या कामाबाबत बोर्डाकडे काहीच कागदपत्रे, माहिती उपलब्ध नसल्याचे बोर्डातील अधिकारी सांगतात. सुशोभीकरणात कोणकोणत्या कामांचा समावेश करण्यात आला होता. कोणत्या कामासाठी किती खर्च करण्यात आला, याची सर्व माहिती राज्य मंडळाकडेच असल्याचेही पुणे बोर्डातील अधिकारी यांनी नमूद केले आहे.
लिफ्टसाठी प्रस्तावाच्या हालचाली
लगेज व प्रवासी लिफ्टची कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, यासाठीही लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. याबाबत पुणे बोर्डाकडून राज्य मंडळाला प्रस्ताव पाठविण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत.