fbpx

इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ

नवी दिल्ली – शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या दारात पाच ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ केली. त्यामुळे क्रुड आयात कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना अधिक दर मिळण्यास मदत होणार आहे. 

सध्या पेट्रोलमध्ये दहा टक्‍के इथेनॉल मिसळले जाते. हे प्रमाण वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यानंतर वाहनाचे उत्सर्जन तुलनेने कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते. या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

सरकारने वाढविलेल्या दरामुळे उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलला 62 रु. 65 पैसे प्रति लिटर दर मिळणार आहे. मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलला 45 रुपये 59 पैसे दर मिळणार आहे. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्‍के पेट्रोल आयात करतो.

इथेनॉलचे दर वाढत असल्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढू लागले आहे. 2013-14 मध्ये 38 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जात होते. आता 195 कोटी लिटरचे उत्पादन केले जात आहे. नजीकच्या भविष्यात इथेनॉलचे उत्पादन 465 कोटी लिटरपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे.

भारतात गरजेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन होते. त्यामुळे साखर कारखान्यांना साखरेसाठी चांगला दर मिळत नाही. इथेनॉल निर्माण केल्यानंतर साखर कारखान्यांना सरकारने ठरविलेला चांगला दर मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.