Women crime rate – राज्यात गतवर्षीसुद्धा महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. राज्यातील प्रमुख पाच शहरांत बलात्काराच्या २३२९ घटना घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या स्थानावर मुंबई कायम आहे तर दुसऱ्या स्थानावर पुण्याचा क्रमांक लागतो.
तिसऱ्या स्थानावर ठाणे शहर तर चौथ्या स्थानावर नागपूरचा क्रमांक लागतो, ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरील वार्षिक आकडेवारीतून समोर आली. यामुळे राज्यात महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या स्थानावर आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा जरी सरकारने केला असला तरी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२४ यादरम्यान मुंबई शहरात सर्वाधिक ९५८ मुली-तरुणी आणि महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. गेल्या वर्षी ८७८ बलात्काराची नोंद मुंबई पोलिसांत होती. तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येसुद्धा मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.
दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. पुण्यात ४३९ महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. तर ६१३ विनयभंगाच्या घटनांची नोंदसुद्धा पुणे शहरात झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर ठाणे शहर असून बलात्काराचे ३९७ गुन्हे दाखल आहेत.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला अत्याचारांमध्ये वाढ दिसून आली. ही आकडेवारी महिला सुरक्षेचे दावे करणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारी आहे. गत तीन वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव राज्य शासनाच्याच अहवालातून समोर आले आहे.
गृहमंत्र्यांचे नागपूर चौथ्या स्थानावर
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे नागपूर आहे. नागपुरात बलात्काराच्या २९७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विनयभंगाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
तरुणी व महिलांशी अश्लील चाळे केल्याच्या ४९९ गुन्ह्यांची नोंद नागपूर पोलिसांनी केली आहे. अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसह कौटुंबिक हिंसाचारही वाढला आहे. महिला सुरक्षेबाबत पोलिस गंभीर नसल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.