संपूर्ण मराठवाडा, उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रात भीषण दुष्काळ

महसूल मंत्र्यांची माहिती : पालकमंत्री आजपासून दुष्काळी दौऱ्यावर

मुंबई – राज्य सरकारने 151 तालुक्‍यात अगोदरच दुष्काळ जाहीर केला असताना तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे संपूर्ण मराठवाडा, उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अजूनही आचारसंहिता असली तरी लोकप्रतिनिधीच्या अधिकारात राज्याचे संबंधित जिल्हयांचे पालकमंत्री उद्या, शुक्रवारपासून दुष्काळी भागाचा दौरा करून उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान झाले. निवडणुकीच्या काळातच राज्यातील दुष्काळाची परिस्थिती भीषण बनली. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यकर्त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष देता आले नाही. सोमवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर राज्य सरकारने आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मंत्रीमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित पत्रकारपरिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यावेळी उपस्थित होते. दुष्काळी उपाययोजनांचा पाठपुरावा अधिक जलदगतीने करता यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. मात्र, अद्याप निवडणूक आयोगाचे उत्तर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची बैठक झाली.

परवानगी नसली तर दुष्काळी भागातील बैठकांना सरकारी अधिकाऱ्यांना बोलावू शकत नाही. पण लोकप्रतिनिधी म्हणून दुष्काळी भागात जाण्याचा, तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यानंतर परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, संपूर्ण मराठवाडयात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, विदर्भातील बुलढाणा, पश्‍चिम महाराष्ट्रातील माण, खटाव या भागात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. राज्यभरात 1264 चारा छावण्या प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. मागेल त्याला चारा छावणी देण्यात येत आहे.छावणीत मोठ्या जनावराला आधी 70 रूपये देण्यात येत होते, ते आता 90 रूपये करण्यात आले आहेत. छोट्या जनावराला 45 च्या ऐवजी 65 रूपये देण्यात येत आहेत. 4 हजार 774 टॅंकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टॅंकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांतना देण्यात आले आहेत. रोहयोवर 2 लाख 74 हजार कामगार काम करत आहेत.आता 365 दिवस काम देण्यात येणार आहे.

दुष्काळी भागात जशा प्रकारे 8 महत्वाच्या उपाययोजना करण्यात येतात. त्याचवेळी पाणीवापराबाबत निर्बंधही घालण्यात येतात. दुष्काळी भागातील बांधकामांच्या पाणीवापरावर निर्बंध आहेत. आयपीएल सामने जिथे खेळविले जातात तिथे अद्याप तरी पाण्याची टंचाई असल्याची चर्चा आमच्या कानावर नाही. पण तसे असल्यास त्याबाबतही आढावा घेउन विचार करू असे चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

औरंगाबादमध्ये केवळ पाच टक्‍के पाणीसाठा
औरंगाबादमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीत 30.46 टक्‍के पाणीसाठा होता.मात्र यावर्षी केवळ 5.27 टक्‍केच पाणीसाठा उरल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. पुण्यातही 23.66, नाशिक 18.36,नागपूर 10.9 तर कोकणात 40.7 टक्‍के पाणीसाठा उरला आहे. शेवटचे दोन महिने पाउस कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबादमध्ये परिस्थिती गंभीर असली तरी एमआयडीसीला पाणी देण्यात कोणतीही अडचण नसल्याचेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंतचे पाणी, चारा आदींचे नियोजन झाले आहे. त्यामुळे सध्या तरी रेल्वेने पाणी पुरविण्याची वेळ येणार नाही. जूनच्या 10 तारखेपर्यंत पाउस सुरू झाल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.