पिंपरी, दि. 10 – पिंपरी येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे सोसायटीच्या पार्किंगमधून दोघांनी अपहरण केले. त्यानंतर त्याचा खून केला आणि मुलाचा मृतदेह भोसरी एमआयडीसीमधील एका पडक्या कंपनीच्या टेरेसवर फेकला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 9) रात्री उशिरा उघडकीस आला.आदित्य गजानन ओगले (वय 7) असे अपहरण आणि खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गजानन श्रीकांत ओगले (वय 49, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात आदित्यच्या अपहरणाची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मंथन किरण भोसले (रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी), अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे (रा. घरकुल, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेला. त्यानंतर तो दिसून न आल्याने सोसायटीमधील दोन मुलींनी ओगले यांच्या घरी येऊन सांगितले. त्यानंतर फिर्यादी गजानन ओगले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आदित्यचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने गजानन यांनी पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखत पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेने देखील समांतर तपास सुरू केला.
गुंडा विरोधी पथकाने गजानन ओगले यांच्या सोसायटीत राहणाऱ्या मंथन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्यावर संशय बळावल्याने मंथनकडे कसून चौकशी केली असता त्याने आदित्यचा खून केल्याचे सांगितले. त्याला या गुन्ह्यात अनिकेत समुद्रे याने मदत केल्याचे सांगितले.
एमआयडीसीमधील बंद कंपनीत फेकला मृतदेह
आरोपींनी आदित्यचे अपहरण करून त्याचा मृतदेह भोसरी एमआयडीसीमधील एका बंद असलेल्या कंपनीच्या टेरेसवर टाकला. पोलिसांनी मंथन याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या टेरेसवरून शुक्रवारी रात्री आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला.
20 कोटींची मागणी पण…
आरोपींनी आदित्यचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी आदित्यचे वडील गजानन ओगले यांना फोन केला. फोनवर आरोपींनी गजानन यांच्याकडे वीस कोटी रुपयांची मागणी केली. पैशांची मागणी केल्यानंतरही आरोपींनी आदित्यचा खून केला. आरोपी मंथन हा गजानन ओगले यांच्याच सोसायटीत राहत आहे. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर अन्य कारणांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.
लहान मुलाचा खून करणाऱ्यांचे वकीलपत्र घेणार नाही