खळबळजनक ! सात वर्षीय मुलानं प्रख्यात डिझायनर गुस्सीचा पुनर्जन्म झाल्याचा केला दावा

वॉशिंग्टन – साधारणपणे सात वर्षे वयाच्या मुलाला आपले कपडे पण नीट सांभाळता येत नाहीत किंवा कोणते कपडे घालावेत याबाबतची त्याच्याकडे कोणताही चॉईसही असू शकत नाही. पण सध्या अमेरिकेत अशा एका फॅशन डिझायनरची चर्चा सुरू आहे, ज्याचे वय फक्त सात वर्षे आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून फॅशन डिझायनिंगचे काम करणाऱ्या या मुलाचे नाव मॅक्स अलेक्झांडर असे आहे. या डिझायनरने एक खळबळजनक दावा केला आहे.
मॅक्सने आपण प्रख्यात डिझायनर गुसीओ गुस्सीचा पुनर्जन्म आहोत असा दावा केला आहे. गुस्सी हा प्रख्यात इटालियन फॅशन डिझायनर होता. त्याच्या विषयी मॅक्स अलेक्झांडरला संपूर्ण माहिती आहे. 2021 मध्ये एका कपड्यांच्या दुकानात आईसोबत गेल्यानंतर अचानक मॅक्स अलेक्झांडरला आपण फॅशन डिझायनिंग करावे असे वाटले.
त्या दुकानात असलेले विविध पुतळे पाहून त्यांना सूट होतील असे कपडे शिवण्याचे त्याच्या डोक्यात आले. त्यानंतर त्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्याने डिझाईन केलेले कपडे अतिशय वेगळे आणि उच्च दर्जाचे होते. त्यामुळे लवकरच त्याला लोकप्रियता मिळाली एवढेच नव्हे तर त्याच्या क्लायंटच्या लिस्टमध्ये प्रख्यात कलाकार शेरान स्टोन हिचे सुद्धा नाव आहे.





