लोणावळा, दि.1 (वार्ताहर) -देशातील विविध पर्यटनस्थळांसाठी राबविण्यात आलेल्या “स्वच्छता लीग 2022′ या अभियानात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात लोणावळा शहराने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या यशामुळे लोणावळा शहराच्या नावाला पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात झळाळी मिळाली आहे.
देशभरातील पर्यटन स्थळांसाठी 17 सप्टेंबरला इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन केले गेले होते. या लीगमध्ये देशभरातील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटातील एकूण 1850 शहरे सहभागी झाली होती. लोणावळा शहराच्या ब्रॅण्ड ऍम्बॉसिडर असलेल्या सिनेअभिनेत्री आयेशा झुल्का, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्व शाळा, सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिल्ली येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर, शहरी विकास मंत्रालयाच्या रूपा मिश्रा, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव निकुंज श्रीवास्तव व अमृत अभिजात यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेला गौरविण्यात आले.
लोणावळा नगरपरिषदेच्या नगर अभियंता वैशाली मठपती, नगर परिषद अभियंता यशवंत मुंडे, खरेदी पर्यवेक्षक दत्तात्रय सुतार, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर आणि शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता जाहीर होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या निकालाची उत्सुकता शहरवासीयांना आहे. त्या मुख्य स्पर्धेत देखील लोणावळा शहराला असेच नेत्रदीपक यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दोन ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रम
या लीगसाठी कॅप्टन म्हणून लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तलाव ते राजमाची उद्यान आणि सहारा पूल ते भुशी धरण या दोन ठिकाणी स्वच्छता अभियानासोबतच पथनाट्य, प्लोग अ थोनसह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यापूर्वीदेखील लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य केले आहे. नगरपरिषदेच्या या कार्याचे विविध स्तरांतुन कौतुक होत आहे.