उपजीविका, उपचारांसाठी पैशांची गरज : पत्नी, मुलांविरुद्ध दावा दाखल
पुणे – ‘ते’ चाळीस वर्षे न्यायालयाची पायरी चढले… वकील म्हणून प्रॅक्टिस केली. अनेकांना न्याय मिळवून दिला. मात्र, “ते’ स्वत: आता आजारी आहेत. त्यांच्यावर आता न्याय मागण्याची वेळ आली आहे. देखभाल आणि उपचारासाठी पैसे मिळावेत, यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. पोटगी मिळावी म्हणून दोन मुले, सुना आणि पत्नीविरोधात “त्यांनी’ दावा दाखल केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांच्या न्यायालयात यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
“त्या’ वकिलाने पुणे जिल्हा न्यायालय आणि सातारा न्यायालय येथे 40 वर्ष वकिली केली आहे. अर्धांगवायूचा झटका आला, तसेच दोन वेळा ऍन्जिओग्राफी झाल्यामुळे संबंधित वकील त्यांचा व्यवसाय करू शकत नाहीत. त्यांच्या देखभालीसाठी आणि उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून ऍड. राजेश कातोरे, ऍड. नीलिमा खर्डे, ऍड. साक्षी परबत यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. संबंधित अर्जदाराला लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मुलांनी एक लाख रुपये आणि दर महिना दोघांनी मिळून 50 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी दाव्यात केली आहे.
अर्जदार यांना दोन मुले आहेत, त्यांची लग्न थाटामाटात लावून दिली. दहा वर्षांपूर्वी अर्जदाराला अर्धांगवायूचा झटका आला. याप्रकरणी अर्जदाराने वानवडी आणि हडपसर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, अर्जाची दखल घेण्यात आली नाही. विविध आजारांमुळे त्यांना पूर्णवेळ हाऊसमेड आणि नर्सची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांकडून देखभाल खर्च मिळावा, म्हणून त्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती ऍड. राजेश कातोरे यांनी दिली.