जंजगीर : छत्तीसगडमधील जंजगीर-चंपा जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (65) यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिलासपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. मात्र या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्यापही गुलगस्त्यात आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड शहरातील जंजगीर भागातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (65) यांनी 30 ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी दिनेश नंदनी यादव (55), दोन्ही मुले नीरज यादव (32) आणि सूरज यादव (27) यांच्यासह विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या सर्वांना बिलासपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. बिलासपूर येथील सिम्स रुग्णालयात उपचारादरम्यान नीरज यादवचा मृत्यू झाला.
यानंतर पंचराम यादव, दिनेश नंदानी यादव आणि सूरज यादव यांना आरबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 31 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती एएसपी राजेंद्र जैस्वाल यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचराम यादव हे कंत्राटदार म्हणून काम करत होते. त्यांना हृदयाशी निगडीत आजार होता, तर त्यांची पत्नी कर्करोगाने ग्रस्त होती. तर त्यांचा मोठा मुलगा नीरज यादव हा खासगी नोकरी करत होता, तर त्यांचा छोटा मुलगा त्यांच्याप्रमाणे कंत्राटदार म्हणून काम करायचा. पंचराम यादव यांनी यापूर्वी दोन बँकांकडून 40 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांना कर्ज फेडता न आल्यामुळे त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.