पुणे : घरबसल्या अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाला तब्बल ६८ लाख १२ हजार रुपयांना फसवले आहे. ही घटना २३ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. या प्रकरणी ६० वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, २३ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून संवाद साधला.
घरसबल्या जास्त कमाईचे आमिष दाखवित सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाचा विश्वास संपादित केला. त्यानुसार ज्येष्ठाने संबंधित बँक खात्यावर रक्कम पाठविण्यास सुरूवात केली. तब्बल ६८ लाख १२ हजार रूपये वर्ग करूनही जेष्ठाला जादा परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी फोनकर्त्याला पैशांची मागणी सुरू केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करीत आहेत.