पुस्तक परीक्षण: एका स्टुडिओचे आत्मवृत्त

माधुरी तळवलकर
चित्रपट निर्मितीच्या ज्या मूलभूत सोयी आपण आता गृहीत धरतो, त्या शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हत्या. कोल्हापूरच्या स्टुडिओत विजेशिवाय चित्रीकरण होत असे. “एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ या प्रभाकर पेंढारकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या रूपाने चित्रपटसृष्टीचा महत्त्वपूर्ण दस्तावेज ग्रथित झाला आहे.

भालजींनी पटकथा व दिग्दर्शन केलेल्या “श्‍यामसुंदर’ ह्या चित्रपटाचा देशात पहिल्यांदा रौप्यमहोत्सव साजरा झाला. त्यानंतर त्यांनी केलेला “आकाशवाणी’ चित्रपट हिंदीतही तयार करण्यात आला. मुंबई, दिल्ली, कलकत्ता ह्या प्रमुख शहरात तो वितरित केला आणि त्याला सर्वत्र यश मिळाले. त्यानंतर भांडवल, वितरण अशा अनेक अडचणींमधून वाट काढीत भालजींनी उत्तमोत्तम चित्रपट महाराष्ट्राला दिले. सुरुवातीला ब्रह्मचारी, महारथी कर्ण, देवता, पहिला पाळणा असे काही चित्रपट गाजले. मग दुसरे महायुद्ध सुरू झाले. लोकांच्या मनाला स्वातंत्र्याची आस लागली. ती ज्योत तेवती ठेवणे हे आपले कर्तव्यच मानून मग त्यांनी थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, राजा शिवछत्रपती अशा उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली.

स्वा. सावरकरांनी स्टुडिओला दिलेल्या चैतन्यमय भेटीचे वर्णन वाचून तर आपण रोमांचित होतो. तिथल्या विभागांवर लिहिलेल्या पाट्या मराठीत असायला हव्यात असे सावरकरांनी सुचविले. “मराठीत योग्य शब्द शोधावे लागतील…’ असे म्हटल्यावर त्यांनी चक्‍क “कशाला, मी सांगतो. लिहून घ्या…’ असे म्हणून भराभर दिग्दर्शक, छायाचित्रण, संकलन, ध्वनिमुद्रण विभाग, रंगपट अशी नावे सुचवली. शेवटी सावरकर म्हणाले, “ह्या सर्वामध्ये काही अवघड, न समजण्याजोगे आहे का? नाही ना, मग आजपासूनच हे शब्द वापरायला सुरुवात करा. हा इंग्रज प्रथम आपल्या मनातून गेला पाहिजे.

भाषेतून, विचारातून गेला पाहिजे… मग एक दिवस तो आपल्या देशातूनही जाईल.’ असे एकाहून एक भारावून टाकणारे प्रसंग या पुस्तकात आपण वाचत जातो आणि एकदा हातात घेतलेले पुस्तक सोडावेसे वाटतच नाही. ध्यानीमनी नसताना म.गांधींची हत्त्या झाली आणि संतप्त जमावाच्या अविचारामध्ये स्टडिओचा बळी गेला. जिवापाड जपलेले कॅमेरे, लाखो रुपयांची मौल्यवान मशिनरी, “मीठभाकर’ ही नवीकोरी फिल्म… सगळे हल्लेखोरांच्या क्रोधाग्नीत भस्म झाले. पण त्यांनी वर्षाच्या आत “मीठभाकर’ हा चित्रपट पुन्हा नव्याने तयार करून झळकवला.

साधी माणसं, तांबडी माती या त्यांच्या चित्रपटांना लाभलेले राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी व्रतस्थ वृत्तीने स्वीकारले. हा जिद्दीचा प्रवास वाचताना आपण थरारून जातो. चित्रपटाचा सुवर्णकाळ चित्रित करणाऱ्या या पुस्तकाचे निर्मितीमूल्यही त्याला साजेसेच आहे. पुस्तकात संजय शेलार यांची जवळजवळ शंभरेक स्केचेस आहेत. केवळ या चित्रांसाठीसुद्धा राजेंद्र प्रकाशनचे हे पुस्तक संग्रही ठेवावेसे वाटेल. वेधक मुखपृष्ठ, मजकुरासाठी उत्तम आर्ट पेपर, भरपूर मार्जिन आणि सुरेख फोटोग्राफ्स यांमुळे हे पुस्तक अगदी देखणे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.