लंडन – समुद्र किनाऱ्यावर फेकून दिलेला मास्क चोचीत धरून निघालेल्या सीगल पक्षाचे छायाचित्र सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले. त्याचबरोबर या छायाचित्रामुळे पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या आणि निसर्गाप्रती संवेदनशील असणाऱ्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये काढण्यात आलेल्या चित्रात सीगल पक्षाचे पिल्लू चोचीत मास्क धरून चालत असल्याचे दिसत आहे.
जगभर फैलावलेल्या करोनाच्या साथीमुळे मास्कला आणि त्यातही डिस्पोजेबल मास्कला मागणी वाढली आहे. अनेक देशांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे केल्यामुळे नागरिक मास्क वापरत आहेत. मात्र अनेकांना एकदा वापरून फेकून द्यायचे मास्क वापरणे सोपे वाटते. विशेषतः सहलीला, बीचवर गेल्यावर असे मास्क वापरून फेकून दिले जातात. लोक करोनाबाबत जागरूक आहेत मात्र मास्क कुठेही फेकून दिल्यामुळे होणारी निसर्गाची हानी आणि पक्षी, कीटक, जनावरे यांचा विचार करताना दिसत नाहीत.
मास्क घेऊन जाणाऱ्या सीगलच्या पिल्लाचे सोबतचे छायाचित्र ब्रिटनमधील वेस्टन-सुपर-मेर शहरात घेण्यात आली असल्याचे बर्नहॅम अँड हायब्रीड वीकली न्यूजने म्हटले आहे. या गावातील निक नावाची 52 वर्षांची व्यक्ती सायकलवरून बीचकडे फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांना सीगल फेस मास्क चोचीत धरून चालल्याचे दिसले. त्याचवेळी किनाऱ्यावर अनेक ठिकाणी वापरलेले मास्क तसेच फेकून देण्यात आल्याचे दिसत होते. त्या पडलेल्या मास्कची छायाचित्रे काढत असतानाच सीगलचे एक पिल्लू वापरलेला एक मास्क चोचीत धरून चालल्याचे त्यांना दिसले. ते पिल्लू खूपच छोटे होते. हे दृश्य पाहून त्यांचे मन हेलावले.
वेस्टन-सुपर-मेर हे या भागातील सहलीसाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. वीकेंडला अनेकजण इथे येतात आणि मास्क व पीपीई किट इथेच टाकून जातात.
हा फोटो ट्वीटरवर अनेकांनी शेअर केला. त्याचबरोबर निसर्ग आणि पर्यावरणाप्रती आपली काय जबाबदारी आहे हे या छायाचित्रातून दिसते असे लोकांनी म्हटलेले आहे. जैविक कचरा असा निष्काळजीपणे टाकून दिला तर पाणी, समुद्र, जलचर यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच करोनाकाळात आणि नंतरही जैविक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे ही मनुष्याची जबाबदारी आहे ही बाब लक्षात घेण आवश्यक आहे.