अबाऊट टर्न : पत्रप्रपंच

-हिमांशू

फळ्यावर लिहिल्या जाणाऱ्या किंवा व्हॉट्‌सऍपमधून एकमेकांना पाठविल्या जाणाऱ्या सुविचारांवर जग चालतं का? त्याहून महत्त्वाचा प्रश्‍न असा की, सुविचार खरडणारे किंवा “फॉर्वर्डणारे’ स्वतः त्याप्रमाणं वागतात का? या दोन प्रश्‍नांची उत्तरं शोधल्यास आपल्याला असं दिसून येतं की, मूल्यं आणि आपलं दैनंदिन जीवन यांची कधीच फारकत झाली आहे आणि आता या दोहोंमध्ये मोठी दरी पडली आहे.

शाळेच्या पुस्तकातले अनेक धडे आता आपण केवळ “नॉस्टेल्जिया’ म्हणून आठवू शकतो. कारण “स्वतःपुरतं पाहा,’ हा महत्त्वाचा धडा शाळा-कॉलेजात असतानाच आपल्याला अपरोक्षपणे शिकवण्यात आलाय. भावनेवर जग चालत नाही, व्यवहारच महत्त्वाचा हेही आपण आता कोळून प्यायलो आहोत. त्यामुळं “विद्या विनयेन शोभते’ या सुविचारापासून अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रापर्यंत सारंकाही शाळेच्या भिंतीवर “शोकेस’ बनून राहिलंय आणि आपण त्याची फक्‍त हताशपणे आठवण काढू शकतो. या आठवणी आज जाग्या केल्या आहेत.

एका शाळकरी मुलीच्या पत्रानं. भावनिक असलं तरी तितकंच व्यावहारिक असणारं हे पत्र तिनं मुख्यमंत्र्यांना लिहिलंय; पण सरकारच्या दृष्टीनं ते व्यावहारिक बिलकूल ठरणार नाही. कदाचित त्यामुळेच चार दिवस बातमीचा विषय बनून नंतर ते पत्र दृष्टिआड होईल. चंद्रपूरमधल्या या चिमुरडीनं आपल्या जिल्ह्यासह गडचिरोलीमधली दारूबंदी उठवण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर निर्णय बदलण्याची विनंती या पत्रातून केलीय.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस यांना तिने “दादा’ म्हटलंय. “माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे माझ्या आदित्यदादांना रुचेल का?’ असा रोखठोक प्रश्‍न ही आठवीतली मुलगी सरकारला विचारतेय. “मद्यपी वाहनचालकाने निरापराध जनतेला चिरडावे किंवा माझ्या तेजसदादाच्या गाडीला धडक मारावी, या विचाराने माझे अंग शहारते,’ असं ही छोकरी म्हणतेय. माता जगदंबा आणि जिजाऊ मॉंसाहेबांचा उल्लेख, जो नेत्यांच्या भाषणात असतो तोच तिने पत्रात केलाय.

कुटुंबे उद्‌ध्वस्त करणाऱ्या करामधून आम्ही जगदंबेची ओटी कशी भरणार, असा तिचा सवाल आहे. दरवर्षी आषाढीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला जातात आणि राज्याच्या जनतेला सुखात ठेवण्याचं वरदान मागतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण ही मुलगी मात्र या प्रार्थनेचा हवाला देऊन म्हणते, “असं असताना दारूबंदी उठवावी असा महाराष्ट्राच्याच मंत्रिमहोदयांचा आग्रह का असावा?’ चंद्रपूर आणि गडचिरोलीत दारूबंदी आहे. पण ती कायम ठेवावी की ठेवू नये, याचा विचार करण्यासाठी सरकारनं समिती नेमलीय. शिवाय, लॉकडाऊन सुरू असतानासुद्धा सगळ्यात आधी दारूची दुकानंच उघडली, हे आपल्याकडचं जळजळीत वास्तव चंद्रपुरातल्या “त्या’ चिमुकलीला ठाऊक आहे. म्हणूनच तिनं मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घातलीय.

महाराष्ट्रानं देशात सर्वप्रथम महिला धोरण लागू केलं. या धोरणानुसारच गावातल्या महिलांना मतदानाद्वारे दारूदुकान बंद करण्याचा अधिकार मिळाला. या मुलीनेही पत्रात अशीच एक आठवण सांगितलीय. दारूबंदीच्या मागणीसाठी 1963 मध्ये आदिवासी अनवाणी चालत मुंबईला गेले होते, हे तिनं नमूद केलंय. अर्थातच, दारूबंदी घडवून आणण्यासाठी झगडावं लागतं; पण ती उठवणं खूप सोपंय! शिवाय, भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ हा जगाचा नियम असल्यामुळे एका पत्रावरून दारूबंदीसंबंधीचा निर्णय घेतला जाईल, याची शक्‍यता कमीच!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.