नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील लष्करी कमांडर पातळीवरील चर्चेची पुढील फेरी शनिवारी होणार आहे. पुर्व लडाख मधील पॅंगॉग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूकडील लष्कर मागे घेण्याच्या प्रक्रियेचे तपशील या चर्चेत निश्चीत केला जाणार आहेत असे सांगण्यात येते.
तेथील लष्करी तुकड्यांच्या माघारीचा प्रस्ताव दोन्ही देशांनी या आधीच मान्य केला आहे. ही चर्चा चीन कडील मोल्डो सीमेवर होणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करामध्ये तेथे गेले नऊ महिने तणाव असून दोन्ही बाजूचे लष्कर एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मोठाच तणाव निर्माण झाला आहे.
पण दोन्ही देशांनी लष्कर मागे घेण्याचे मान्य केले असून ती प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरूही झाली आहे. चीनचे लष्कर फिंगर आठ पर्यंत मागे घेतले जाईल तर भारताचे लष्कर फिंगर तीन जवळील आपल्या पुर्वीच्या धनसिंग थापा पोस्ट पर्यंत मागे घेतले जाणार आहे.
तथापि दोन्ही देशांमध्ये देसपांग, हॉट स्प्रींग आणि गोग्रा येथील लष्करी माघारीबाबतचा वाद अद्याप कायम असून त्यावर दोन्ही देशांच्या चर्चेच्या पुढील फेऱ्यांमध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.