happy birthday big b : अमिताभ नावाचं वलय 

अभिनयाचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस. त्यांना
“दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळाल्याने जो आनंद झाला आहे तो शब्दांत व्यक्‍त करणं फारच अवघड आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या फॅन्ससाठी हा सुवर्ण महोत्सव आहे. या अचाट शक्‍तीच्या सदाबहार व्यक्‍तिमत्त्वानं आपल्या अभिनयातून चित्रपट पाहिल्याचं समाधान दिलंच, शिवाय आपले पैसे सार्थकी लागल्याचा मनमुराद आनंदही दिला. आजही त्यांचे कुठले चित्रपट रिलीज होणार असतील तर चाहते त्या चित्रपटाची अगदी चातकासारखी वाट पाहात असतात. कारण त्यांच्या अभिनयातील दाट हिरवाई पाहून आपलं मन एकदम फ्रेश होणार ह्याची चाहत्यांना खात्री असते.

आकाशवाणीनं ज्या आवाजाला, कलाकाराला नाकारलं तो आज सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरतो आहे ह्या सारखा दुसरा आनंद नाही. आता हे लिहिताना इतक्‍यात झालेला ‘केबीसी’ मधील ‘कर्मवीर विशेष भाग’ आठवला. त्या भागात पद्मश्री डॉ. बी. रमना राव आले होते. ते म्हणाले की, कोमामध्ये असलेल्या पेशंटने तुमचा नुसता आवाज जरी ऐकला तरी त्याच्या मस्तकात संवेदना जागृत होतील, असा तुमचा आवाज आहे. अशी पसंतीची कॉम्प्लिमेंट मिळायला भाग्य लागतं नाही का? अर्थात त्यांचं हे म्हणणं कुणीही कधीही नाकारू शकत नाही.

त्यांचा कुठलाही चित्रपट घ्या त्यांच्या फॅन्सला त्यातील रोल, संवाद, गाणी कसं सगळं तोंडपाठ असतं. ह्या सुपरस्टारचे सुपरडुपर हिट ठरलेल्या चित्रपटांची पारायणं केलेले फॅन्स जगभरात लाखोंनी काय करोडोंनी आहेत. आजही टीव्ही लावावा आणि रिमोटने चॅनल बदलत असता जुना किंवा अगदी अलीकडचा बच्चन चित्रपट लागलेला दिसला तर रिमोटचा देखील पटकन पुतळा होतो. ही त्यांनी स्वकष्टानं मिळवलेली अफलातून ताकद आहे.

खरंच नुसतं ‘अमिताभ’ हे नाव घेतलं तरी सकारात्मक शक्‍तीचं वलय आपल्या सभोवताली तयार होतं. असा हा कलाकार आहे ज्याचे सर्व वयातील फॅन्स आहेत.आजही कुठलंही नवीन काम करताना जणू प्रथमच ते काम हाती घेतलं आहे अशी ते तयारी करतात. सदैव उत्साहित तितकेच प्रफुल्लीत असतात.

भूमिकेत जीव ओततात आणि भूमिका अक्षरशः जगतात. कलाकार होऊ इच्छिणाऱ्या व्यक्‍तींनी त्यांच्या चित्रपटातील एक एक दृश्‍याचा वारंवार अभ्यास करावा. ह्या अभिनय शाळेतून शिकावं. तेव्हा कुठं अभिनय मधला ‘अ’ अंशतः समजू लागेल. इतका काळ जाऊनही आजही हा माणूस सतत व्यग्र असतो. मग चित्रपट, टीव्ही, जाहिरात, लिखाण असो वा सोशल मीडिया असो. सतत कार्यशील राहून सतत नवनवीन शिकण्याची इच्छा जागृत ठेवणारा हा कलाकार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.