संयुक्त राष्ट्र – जगभर फैलाव झालेल्या करोना विषाणूच्या साथीचा मुकाबला करता यावा यासाठी सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या सर्व ठिकाणी तातडीने युद्धबंदी लागू करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राने करावा, असे आवाहन फ्रान्स आणि ट्युनिशियाने केले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्व असलेल्या पाच देशांपैकी नकाराधिकार असलेल्या फ्रान्सने हे आवाहन केले असल्याने संयुक्त राष्ट्रामध्ये असा ठराव मंजूर केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका आणि चीन दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेबाबतच्या वादावरील चर्चेसाठीच मतदान करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.
प्रथम चीनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूचा फैलाव जगभरात होण्यापासून रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेसाठीचे अर्थसहाय्य स्थगित केले आहे. “डब्लूएचओ’ केवळ चीनच्या बचावासाठी पोपटपंची करत असून करोनाच्या फैलावाला चीनला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली आहे. मात्र चीनने “डब्लूएचओ’चा बचाव केला आहे.
जागतिक पातळीवरील करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी चीनच्या भूमिकेचा समावेश कोणत्याही ठरावामध्ये करण्यात यावा, अशी मागणीही चीनने केली आहे. अमेरिकेने मात्र या ठरावात पारदर्शकता असावी, असाच आग्रह धरला असून त्यामध्ये “डब्लूएचओ’चा कोणताही उल्लेख अमेरिकेने केलेला नाही.
सुरक्षा परिषदेतील 15 सदस्य देशांच्या राजदूतांनी मंगळवारी खासगीमध्ये फ्रान्स आणि ट्युनिशियाच्या मसुद्याबाबत चर्चा केली. फ्रान्सचे राजदूत निकोलस डे रिव्हायरी यांनी ही चर्चा चांगली झाल्याचे सांगितले. या ठरावासाठी फ्रान्स आणि ट्युनिशियाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सुरक्षा परिषदेला यानुसार ठराव करावाच लागेल, असे ट्युनिशियाचे राजदूत कैस काबतानी यांनी काही पत्रकारांना सांगितले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच संयुक्त राष्ट्राला इतक्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा ठराव लवकरात लवकर करण्यात यावा यावर ट्युनिशियाने विशेष भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 23 मार्च रोजी सर्व जागतिक संघर्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रसंधी करण्याची मागणी केली आहे. तसेच सुरक्षा परिषदेत तसा ठराव होण्याची आशाही व्यक्त केली होती.
एप्रिलमध्ये झाले दोन ठराव…
एप्रिलमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या 193-सदस्यांच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये कोविड-19 वर दोन ठराव मंजूर केले आहेत. त्यातील एका ठरावामध्ये या साथीच्या अनपेक्षित परिणामांची जाणीव करून देण्यात आली आणि जागतिक समुदायाकडून सामुहिक उपाय योजना तीव्र करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसऱ्या ठरावात विकास, उत्पादनाची गती वाढवणे आणि औषधे, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठरावांमध्ये जगभरातील देशांचे मत प्रतिबिंबित झाले असून त्याचा कायदेशीर बंधन नाही. त्याच्या उलट सुरक्षा परिषदेचा ठराव कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असतो.