मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका सफाई कर्मचाऱ्याच्या नौकरीवर संक्रात आली होती. त्याच्या कचरा वाहुन नेण्याच्या हातगाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यावरच संक्रात आली होती. मात्र जर त्याला ताबडतोब नौकरीवर परत घेतले नाही, तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील कचरा उचलणे बंद करू असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यात आले आहे.
कचरा गाडीतून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र घेउन जात असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याची सेवा मथुरा पालिकेने बरखास्त केली होती. या प्रकारामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संघटना संतप्त झाली होती. 72 तासांत त्या कर्मचाऱ्याला कामावर परत घेतले नाही, तर आम्ही राज्यभरातील कचरा उचलण्याचे काम बंद करू असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानंतर मथुरा पालिकेने आपला निर्णय मागे घेतला. आपण केलेल्या चुकीबद्दल त्याला वाईट वाटत असून त्याने माफी मागितली आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा विचार करून त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले असल्याचे पालिकेच्या आदेशात म्हटले आहे.
बॉबी नावाच्या या सफाई कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला होता. तो कचरा गोळा करून एका गाडीत घेऊन जात होता. त्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमाही होत्या. हा व्हिडिओ समोर आल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. काही लोकांनी या प्रकाराबाबत जोरदार आक्षेपही घेतला होता. त्यानंतर तातडीने त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती.