ऍट्रॉसिटीची भिती दाखवून उकळली आठ लाखांची खंडणी

भाजी व्यवसायाला मदत न केल्याने कृत्य; पोलिसांनी संशयिताच्या आवळल्या मुसक्‍या
सातारा (प्रतिनिधी) –
भाजी व्यवसाय करण्यासाठी तीन लाख रुपयांची मदत न केल्याच्या रागातून ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून शहरातील एका नागरिकाकडून तब्बल 8 लाख चाळीस हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चंद्रकांत दादासो साठे उर्फ बाळू साठे (रा.शाहू बोर्डींगजवळ,सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शंकर गुलाबराव निंबाळकर (रा. गडकरआळी,सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी व संशयित हे दोघे कोटेश्‍वर मंदीरात भजन करण्यासाठी सन 2015 सालापासून जात असल्याने दोघांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर संशयिताला निंबाळकर यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती लागल्यानंतर त्याने सन 2018 मध्ये भाजी व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना तीन लाख रुपये मागितले होते. त्यावर निंबाळकर यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या संशयिताने “”जर तुम्ही मला तीन लाख रुपये दिले नाहीत तर तुमच्यावर ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करेन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या निंबाळकर यांनी त्याला रोख स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते.

या प्रकारामुळे मनोबल वाढलेल्या संशयिताने वेळोवेळी निंबाळकर यांना ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत व त्यांच्या कुटुंबांला मारून टाकण्याची भिती दाखवून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी म्हणून वेळोवेळी 8लाख चाळीस हजार रुपये उखळले. तसेच दि.4 रोजी तो पुन्हा निंबाळकर यांना दोन लाख रुपयांची मागणी करत होता. त्यामुळे वैतागलेल्या निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरन शाखेचे हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, मोहन पवार,पंकज मोहिते, सुनिल मोहिरे यांनी संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.