“राष्ट्रवादी’चा पोलीस आयुक्‍तालयावर मोर्चा 

दत्ता साने कार्यालय तोडफोड : सूत्रधार पकडण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे जनसंपर्क कार्यालय तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावे या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी पोलीस आयुक्‍तालयावर मोर्चा काढला.

कार्यालय तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याने पोलीस प्रशासनाची कारवाई कुठपर्यंत आली आहे, असा जाब कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला. विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कारवाईचे केवळ आश्‍वासन दिले जात आहे, असा आरोप करण्यात आला. या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, मोरेश्‍वर भोंडवे, संजय वाबळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, शमीम पठाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अन्‌ त्या भावुक झाल्या

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या पत्नी हर्षदा साने यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, सार्वजनिक आणि सामाजिक कार्य करत असताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांवरती हल्ले होणार असतील, तर एकही व्यक्‍ती चांगले काम करण्यासाठी पुढे येणार नाही. आतापर्यंत आरोपींना अटक होणे गरजेचे होते. परंतु अटक झाली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. यापुढे सामाजिक काम करायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल. एकही वरिष्ठ अधिकारी मोर्चाला सामोरे जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही दाद मागायची तर कुणाकडे? पोलीस आणि सत्ताधाऱ्यांनी आम्हाला न्याय द्यावा, असेही त्या म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here