पुणे शहर आणि जिल्ह्यात सव्वा कोटी नागरिकांची घरी जाऊन होणार तपासणी

4,905 पथके स्थापन : करोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न

पुणे – करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुणे , पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भाग मिळून 1 कोटी 10 लाख 35 हजार 455 नागरिकांची घरी जाऊन तपासणी करण्याची मोहीम मंगळवारपासून सुरु झाली आहे. या तपासणीसाठी 4 हजार 905 पथके स्थापन केली आहे. यामध्ये संशयित करोनाचे रुग्ण शोधणे, जनतेला आरोग्य शिक्षण देणे आणि मधुमेह, हृद्यविकार, किडनी, लठ्ठपणा यांसारख्या सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना शोधणे जर ते उपचार घेत नसतील तर त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या मोहिमेमुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होणार असल्याचा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.

“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त यांनी सांगितले की, शिक्षणसंस्थांबरोबर याविषयी सकारात्मक चर्चा झाली आहे. या मोहिमेसाठी 50 हजार विद्यार्थी आरोग्य सेवक म्हणून काम करण्यासाठी पुढे आले आहेत.

 

प्रशासनापुढील आव्हाने

  • जिल्ह्यातील सर्व घरे जाऊन घरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याने यामध्ये संशयित व्यक्तींची संख्या सुध्दा वाढणार आहे. यामुळे प्रशासनाला करोना चाचण्यांची संख्या सुध्दा वाढवावी लागणार आहे.
  • करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. यामुळे या रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य होणार आहे.
  • हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे.

अशी होणार तपासणी

प्रत्येक घरात सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर दरवाजावर स्टिकर लावण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सदस्यांची नोंद ऍपमध्ये केली जाणार आहे. इन्फारेड थर्मामीटरने तापमान तसेच पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाणार असून याची नोंद ऍपमध्ये घेतली जाणार आहे. ताप असलेली व्यक्ती आढळ्यास अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे , थकवा आदी लक्षणे आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीस इतर आजार आहे, याची विचारणा केली जाणार आहे. ताप आणि ऑक्सिजन पातळी कमी असल्याच संबधित नागरिकाला फिवर क्लिनिकमध्ये पाठविले जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

  • मोहिमेचा कालावधी

पहिली फेरी – दि.15 सप्टेंबर ते दि.10 ऑक्टोंबर 2020

दुसरी फेरी – दि.14 ऑक्टोंबर ते दि.24 ऑक्टोंबर 2020

Leave A Reply

Your email address will not be published.