स्मार्टकार्डसाठी फलटणमध्ये बसस्थानकावर रांगा

फलटण – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. प्रवास भाडे सवलत सहज आणि सोईस्कररित्या मिळावी यासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे. या स्मार्टकार्डसाठी केवळ 55 रुपये दर आकारण्यात आला आहे. दरम्यान, गत आठवडाभरापासून सदर स्मार्ट कार्ड खरेदीसाठी फलटण बस स्थानकावर ज्येष्ठ नागरिक, स्त्री, पुरुषांची मोठी गर्दी होत आहे.

फलटण बसस्थानक कार्यालयात एक संगणक आणि तदनुषंगिक यंत्रणा उभारली आहे. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत या ठिकाणी ज्येष्ठ स्त्री/पुरुषांची गर्दी होत आहे, या ठिकाणी आतापर्यंत 900 स्मार्ट कार्ड वितरित झाली आहेत. एस. टी. बस स्थानकावरील एसटीच्या या स्मार्ट कार्ड वितरण केंद्राशिवाय शहरात दोन ठिकाणी खाजगी स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र तेथे जवळपास दुप्पट म्हणजे 100 रुपये प्रत्येकी घेतले जात असल्याने या खाजगी केंद्रावर गर्दी कमी आहे.

ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे पत्रकार, डॉ. आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती तसेच शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनाही स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत, त्यामुळे या सर्वांची स्मार्ट कार्ड घेण्यासाठी बस स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. एसटी प्रशासनाने त्यांच्यासाठी किमान सावली आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची आवश्‍यकता आहे.

एसटी ज्येष्ठ नागरिकांना आतापर्यंत प्रवास भाड्यात अमर्याद कि. मी. प्रवास सवलत देत असे मात्र आता स्मार्ट कार्डद्वारे वर्षाला केवळ 4 हजार कि. मी. अंतरासाठी ही प्रवास भाडे सवलत मिळणार आहे. कोणीतरी हा 4000 कि. मी. प्रवास मोफत करता येण्याची आवई उठविली असल्याने प्रत्येकी 4 हजार कि. मी. मोफत प्रवासासाठी मिळणार असल्याच्या आनंदाने स्मार्ट कार्ड खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले.

आतापर्यंत आधार कार्ड, तहसील कार्यालयाने दिलेले वयाचा दाखला असे स्वरुप असलेले कार्ड, अन्य मार्गाने सदर व्यक्तीचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे दर्शविणारी ओळख पत्रे स्विकारली जात मात्र त्यातून काही गैरप्रकार समोर आल्याने एस टी प्रशासनाने स्मार्ट कार्ड संकल्पना आणली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)