साताऱ्याच्या बाइक रायडर्स ग्रुपच्या मोहिमेला धक्का

सातारा  -नवरात्रोत्सवात साडेतीन शक्‍तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या साताऱ्याच्या हिरकणी रायडर्स ग्रुपमधील शुभांगी पवार (वय 32) यांचा मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यामधील दाभड हद्दीत भोकर फाटा (ता. अर्धापूर) येथे पवार यांची दुचाकी घसरून त्या रस्त्यावर पडल्या. त्यावेळी मागून आलेल्या टॅंकरचे चाक त्यांच्या डोक्‍यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.

साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या नऊ सदस्या साडेतीन शक्‍तिपीठांच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 10) कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन निघाल्या. एक हजार 868 किमीचा हा प्रवास त्या बाइकवरून करत होत्या. कोल्हापूर येथून त्या तुळजापूरला गेल्या. तेथे भवानीमातेचे दर्शन घेऊन माहुरगड येथील रेणुकामातेच्या दर्शनासाठी त्या निघाल्या होत्या. या ग्रुपच्या सदस्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यामधील भोकर फाटा येथून जात असताना खराब रस्त्यामुळे शुभांगी पवार यांची बाइक घसरली आणि त्या रस्त्यावर कोसळल्या.

त्याच वेळी मागून आलेल्या टॅंकरचे चाक त्यांच्या डोक्‍यावरुन गेल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. साताऱ्यातील प्रसिद्ध व्यावसायिक संभाजी पवार (मूळ रा. आरफळ, ता. सातारा) यांच्या त्या पत्नी होत. त्यांना दोन मुले आहेत. शुभांगी यांना पहिल्यापासून खेळाची आवड होती. त्यांनी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला होता.

धाडसी मोहिमांमध्ये त्या नेहमीच सहभाग व्हायच्या. या घटनेने हिरकणी ग्रुपच्या सदस्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. ऐन नवरात्रात साताऱ्याच्या या हिरकणीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शुभांगी पवार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपिल अगलावे, पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे, महामार्गचे रमाकांत शिंदे, गजानन डवरे, वसंत शिणगारे, गोविंद टेकाळे यांनी या कामी मदत केली. या अपघातातील टॅंकर (जीजे-12-एटी-6957) पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.