मुंबई – बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा शो ‘बिग बॉस 16’ सुरुवातीपासूनच चाहत्यांचे मनोरंजन करत असून, सध्या हा शो आपल्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, चाहत्यांच्या हृदयाचा प्राण असलेल्या ‘अब्दू रोजिक’ काही दिवसांपूर्वीच शोमधून बाहेर पडला आहे. अब्दूला बिग बॉसच्या घराला निरोप देताना पाहून त्याच्या सर्व चाहत्यांच्या डोळ्यात ओलावा आला होता. तर दुसरीकडे घरातील सर्वच स्पर्धक यावेळी ढसाढसा रडत होते.
घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक असणारा अब्दू रोजिक कायमच चर्चेत राहतो. लवकरच भारतातील वेगवेगळ्या शहरात अब्दू त्याचे कॉन्सर्ट घेणार आहे. आणि त्यासाठीच तो काल पुण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, पुण्यात येताच अब्दुला खास पुणेरी पगडी आणि शाल देऊन त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
छोट्याशा अब्दुवर ही पुणेरी पगडी फारच उठून दिसत असून, यामध्ये तो फारच क्युट दिसत होता. सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरात अब्दू आणि मराठमोळ्या शिव ठाकरेंचं खास नातं होतं. या दोघांमधील बॉण्डिंग वेळोवेळी पडद्यावर दिसलं होतं. आता अब्दुला खास मराठमोळ्या पगडीत पाहून शिवचे चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत. अब्दूच्या या मराठमोळ्या लूकवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.