पुणे : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हिंसक वातवरण निर्मीती झाली आहे. त्यातच आता देशातील विविध राज्यांमध्ये या कायद्याला विरोध दर्शवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातदेखील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात महामोर्चा काढण्यात आला.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रविवारी शहरात मुस्लीम समाज संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या मोर्चात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता. गोळीबार मैदान ते कॉन्सिल हॉल दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला आहे.
दरम्यान,मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. स्थानिक पोलिसांच्या फौजफाट्यासह राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या देखील शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, मोर्चाच्यावेळी संवेदनशील ठिकाणावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे.