ऐझॉल – मिझोराममधील एका मंत्र्याने आपल्या मतदार संघातील ज्या दाम्पत्याला सर्वाधिक अपत्ये आहेत त्यांच्यासाठी एक लाख रुपयांची बक्षीस योजना जाहीर केली आहे. आपल्या मिझो जमातीची लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशातून त्यांनी ही योजना जाहीर केली आहे. रॉबर्ट रायते असे या मंत्र्याचे नाव आहे. ते क्रीडा मंत्री आहेत.
ऐझॉल ईस्ट 2 या मतदार संघाचे ते आमदार आहेत. ज्या गावातील जोडप्याला सर्वाधिक अपत्ये असतील त्याला एक लाख रुपये, करंडक आणि सर्टिफिकेट दिले जाईल अशी घोषणा त्यांनी फादर्स डे च्या एका कार्यक्रमात बोलताना केली. ही बक्षिसाची रक्कम आपण आपल्या व्यक्तीगत खात्यातून देणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा सरकारचा अधिकृत कार्यक्रम नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील मिझो जमातीची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. ती वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. ही एक अदिवासी जमात आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार मिझोरामची एकूण लोकसंख्या 10 लाख 91 हजार 14 इतकीच आहे.