सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविणारी प्रगती शाळा

धानोरीमधील मुंजाबा वस्तीत एका कोपऱ्यात लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येतो आणि रस्त्याच्या कडेला जिथे घरांची दाटवस्ती आहे अशा ठिकाणी एक मोठा बोर्ड दिसतो, त्यावर लिहिलेले दिसते, “एस. के. एम. विद्या प्रतिष्ठान’चे “प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल.’ एका चिंचोळ्या रस्त्यावर उभी असलेली शाळेची ही इमारत आज हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम करते आहे.

2002 साली फक्त 24 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेत आज एकूण 1900 हून अधिक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे काम करत आहे. शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांची शालेय शिक्षणाची गरज भागवण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयोगात्मक शिक्षण पद्धती अवलंबली आहे. क्‍लास रूममध्ये नुसती थिअरीच नाही, तर प्रॅक्‍टिकल शिक्षणावर देखील तितकाच भर दिला जातो. शिक्षक-विद्यार्थी नाते हे अधिकाधिक मैत्रीपूर्ण कसे होईल याकडेही लक्ष केंद्रित केले जाते. शिक्षकांचा परफॉर्मन्स तपासण्याची एक अनोखी पद्धत या शाळेत राबविली जाते. या पद्धतीद्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स सुधारण्याच्या अनुषंगानं काही टार्गेट्‌स दिले जाते. ती पूर्ण केली की त्यांना पॉइंट्‌स दिले जातात. शिक्षकांना मिळणाऱ्या पॉइंट्‌सनुसार त्यांची पगारवाढ आणि इतर गोष्टी ठरवल्या जातात. या पद्धतीमुळं कोणत्याही शिक्षकावर अन्याय होत नसल्याचं संस्थेच्या विश्‍वस्तांचे मत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मिळणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जास्त लक्षात राहतं. त्यामुळंच अभ्यासक्रमांच्या विविध उपक्रम राबविले जातात.

शाळा हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा पाया असतो. शाळेत जे संस्कार होतात, तेच घट्ट आणि कायमस्वरूपी रुजतात. हीच भावना मनात ठेवूत विद्यार्थी घडवणारा समाज निर्माण करण्याच्या भावनेतून माझ्या कुटुंबीयांनी ही शाळा सुरू केली. धानोरी भागात लावलेलं हे प्रगतीचं रोपटं आज खऱ्या अर्थानं रुजलं आणि बहरलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून त्यांना पुढं जाण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे
– प्रीती माने, मुख्याध्यापिका प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल

Leave A Reply

Your email address will not be published.