न्हावरे/वार्ताहर :- निमोणे (ता.शिरूर) येथे घाटकोपर (मुंबई) येथून कुटुंबासह आलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल आज (दि.०१) पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी ‘दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.
घाटकोपर येथून २७ मे रोजी संबंधित व्यक्ती पत्नी व मुलासह आपल्या मूळगावी निमोणे येथे आला होता. मात्र, संबंधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबाला ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील प्रमुखांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन केले होते.
दरम्यान शनिवारी (दि.३०) दुपारी संबंधित ४७ वर्षीय व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला औंध येथील सरकारी रुग्णालयात हलवले होते. तेथे त्याची करोना तपासणी केली असता, संबंधित व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे निमोणे गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बाहेर गावांवरून आलेल्या व्यक्तीच करोनाचा शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परंतु, करुणा पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत क्वारंटाइन केलेल्या त्याच्या कुटुंबातील पत्नी व मुलगा यांचीही करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.