लखनौ – उत्तर प्रदेशाचे महसूल मंत्री महाबीरप्रसाद शुक्ल यांनी उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत असे सांगितले की, उत्तर प्रदेश आणि बिहार किंवा पंजाब, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश यांचे दरम्यान सरहद्द विषयक तंटे आहेत. ते तंटे एका राज्याचा काही भाग दुसऱ्या राज्यात समाविष्ट करून मिटवावे लागतील. तथापि कोणता प्रदेश कोणत्या राज्यात घालावा हे अद्यापही ठरलेले नाही किंवा प्रदेशाची देवघेव करण्यात येणारच नाही ते आजच सांगता येणार नाही.
सहारातील अणुस्फोट चाचण्या थांबवा सूचनेला पाठिंबा मिळत नाही!
यूनो न्यूयॉर्क – सहारा वाळवंटात अणुस्फोटाचे चाचणी प्रयोग थांबवावेत याबद्दल विचार करण्यासाठी यूनोची जनरल असेंब्ली बैठक बोलवावी अशी सूचना यूनोतील आफ्रिका-आशिया राष्ट्रगटाने 15 मार्चला केली होती. परंतु अद्याप या सूचनेला यूनोतील सभासद राष्ट्रांनी अनुकूल उत्तरे पाठवली नाहीत.
पाणी तंट्यात पाकची आडकाठी
नवी दिल्ली – आधीच ठरलेल्या मुद्द्याबाबत पाकिस्तानने नवे प्रश्न उपस्थित केले असले तरी वॉशिंग्टनमध्ये चालू असलेल्या कालव्याच्या पाण्यासंबंधीच्या वाटाघाटी अयशस्वी होण्याच्या बेतात आहेत असे नव्हे, असे वीज आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री हफीज इब्राहिम यांनी आज लोकसभेत त्यांच्या खात्याच्या मागणीवरील
चर्चेचा समारोप करताना सांगितले. ते म्हणाले, आता पाटबंधाऱ्याचा 82 टक्के उपयोग करून घेण्यात येत आहे. 1956 साली 50 टक्केच पाणी उपयोगात आणले जाई.
जर्मन भाषेत गांधीजींचे “सत्याचे प्रयोग’
बर्लिन – लिपझिग येथील सरकारी मालकीच्या प्रकाशन संस्था कोहेलर व अलेलांग महात्मा गांधीजींच्या “माझे सत्याचे प्रयोग’ या ग्रंथाचे जर्मन भाषांतर येत्या हिवाळ्यात प्रसिद्ध करणार आहेत. पूर्व जर्मनीच्या हमबोल्ट विद्यापीठाचे प्रा. हर्बर्ट मेलझिंग हे भाषांतर करणार आहेत. प्रा. मेलझिंग म्हणाले, मी विद्यार्थी असताना या भाषांतराची योजना तयार झाली. 1932 झाली महात्मा गांधी पुणे येथे तुरुंगात असताना मी भाषांतरासाठी परवानगी मिळविली होती.