मुंबई :राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच, बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांची देखील दिल्लीत भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून दिल्लीत नेमकं शिजतंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ आहे, तर इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही निवृत्तीचे वय ६५ करण्याविषयी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी दिल्लीत भेट घेतली आहे. भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये खासदार बजरंग सोनवणे व माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत. या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
एवढेच नाही तर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उपटत आहेत. “दारात आलेल्या विरोधकांचा सन्मान करायची मुंडे साहेबांची प्रथा आजही जोपासली जाते”, “मतभेद असले तरी मनभेद असू नयेत”, “आजी-माजी खासदारांचा आदर्श घ्यावा:, “दबंग खासदार प्रीतम ताई मुंडे” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तर काहींनी संताप देखील व्यक्त केला आहे. “इकडे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडू लागले आणि हे सोबत फोटो काढतात”, “राजकीय वैर आम्ही घ्यायचे यांनी मात्र सोबत फोटो काढायचे”, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अमित शाह यांचीही घेतली भेट
बीड मधील सरपंच हत्याकांड प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बजरंग सोनावणे यांच्या भेटीनंतर लक्ष घातले होते. त्यानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. एम्स रुग्णालयाच्या सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ आहे, तर इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीतही निवृत्तीचे वय ६५ करण्या विषयी या भेटीत चर्चा झाली. मात्र, तरी देखील या भेटीला राजकीय महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram