वॉशिंग्टन, दि. 14- अमेरिकेतून अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. येथील डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशन सेंटरनं केलेल्या दाव्यानुसार करोना लसींचे डोस पूर्ण केलेल्या व्यक्ती या संसर्गापासून सुरक्षित आहेत.
करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती मास्कचा वापर न करता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताही त्यांचं दैनंदिन आयुष्य जगू शकतात. करोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर पाळण्यालाच प्राधान्य देण्यात येत आहे, अशातच अमेरिकेकडून करणात येणारा हा दावा पाहता अनेकांच्या भुवयाही उंचावत आहेत.
करोनाबाधित राष्ट्रांच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत इथे 3 कोटी 36 लाख 15 हजारांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 5 लाख 98 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या तब्बल 63 लाख 58 हजार रुग्णांवर करोनाचा उपचार सुरु आहे. आतापर्यंत अमेरिकेत 2 कोटी 66 लाखांहून अधिक करोनाबाधितांनी या संसर्गावर मातही केली आहे.