सातारा (प्रतिनिधी) – कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका रुग्णाचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण पुण्यातून आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २९, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील २४, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील २ व वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील ९ अशा एकूण ६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमधील तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
काल दि. १५ मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ४०, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ६४ अशा एकूण १०४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाबाधित व्यक्तिंची संख्या- १२९ झाली असून यापैकी ६६ जण उपचार घेत आहेत. तर ६१ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.