पवनानगर (वार्ताहर) – काही दिवसांपूर्वी किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा पडल्याचे प्रकरण ताजे असतानाच, पवन मावळातील आणखीन एक किल्ला तिकोणा गडावरील काही भाग कोसळला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने गडाखालच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी गडावरील श्रीरामाची गादी येथील काही भागात भूस्खलन झाल्याने तेथील दगड-गोटे, माती खाली आले आहेत.
मावळात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यात ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असून यादरम्यान घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी पाउणेबाराच्या सुमारास तिकोणा उर्फ वितंगगड किल्ल्याचा काही भाग कोसळला. मोठा आवाज झाल्याने स्थानिक अजित ज्ञानदेव मोहोळ हे घरातून बाहेर आले आणि त्यांनी गडावरून दगड-गोटे पडताना पाहिले.
त्यांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना आणि प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम देशमुख हेही तातडीने तिथे आले. किल्ल्याच्या पायथ्याशी तिकोणापेठ गाव आहे. मात्र, सुदैवाने गावात कोणतीही हानी झाली नाही.
तहसीलदारांकडून पाहणी –
तिकोणा गडावरील भूस्खलनाची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम देशमुख गडपायथ्याशी आले. त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती घेत पाहणी केली. तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या असून पर्यटकांना गडावर जाण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच लवकरच या ठिकाणचे भू सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले.
तिकोना गड पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. स्थानिक गावकऱ्यांनी देखील काळजी घ्यावी. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनाही अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. – विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ