पाकिस्तानातील न्यायायालयाचे आदेश
इस्लामाबाद – तालिबानचा ठार झालेला म्होरक्या आणि पाक गुप्तचर संघटनेचा लाडका असलेला दहशतवादी मुल्ला मन्सूर याची मालमत्ता लिलाव करण्याचे आदेश पाकिस्तानातील कोर्टाने दिले आहेत.
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामध्ये मुल्ला मन्सूर 2016 साली ठार झाला होता. कराचीमधील मन्सूरच्या पाच मालमत्ता पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने ताब्यात घेतल्या आहेत. या मालमत्तांची अंदाजे किंमत 3 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. मुल्ला मन्सूरने बनावट ओळख दाखवून या मालमत्तांची खरेदी केली होती. आयएसआय आणि तालिबानमधील संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळत असतो.
गेल्या महिन्यात अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने आयएसआयशी संबंधित इसिसच्या अब्दुल्ला ओराकझाइ ऊर्फ अस्लम फारुखी या दहशतवाद्याला अटक केली. काबुलमधील गुरुद्वारावर मार्चमध्ये झालेल्या हल्ल्याचा तो मास्टर माईंड होता. त्याच्याचप्रमाणे मन्सूरवरही आयएसआयचा वरदहस्त होता. त्याने खरेदी केलेल्या मालमत्तांबाबतची माहिती गेल्यावर्षी जुलै महिन्यात दहशतवाद विरोधी विभागाने सादर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
“फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला “ग्रे लिस्ट’मध्ये ठेवण्याबाबत या वर्षी जूनमध्ये फेरविचार होणार होता. मात्र, कोविड-19 मुळे पाकिस्तानला चार महिन्यांची मुदतवाढ मिळाली. या कालावधीतच मन्सूरच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मात्र, पाकिस्तानने 20 एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या यादीतील हजारोंची नावेही वगळली आहेत.