सातारा – दत्तनगर (कोडोली) येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्ख्या चुलत्याने शलमोन मयूर सोनवणे या एक वर्षाच्या चिमुकल्याला विहिरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मारूती सोनवणे (वय 23) याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्ख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला आज शनिवारी सकाळी घरातून नेले. सातारा एमआयडीसी कॅनॉलजवळ असलेल्या दत्तनगर येथील विहिरीत त्याला फेकून दिले. घरातल्यांनी शलमोनचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नाही.
सरतेशेवटी कॉलनीतीलच एकाला शलमोन विहीरीत असल्याचे दिसले. त्यानंतर सातारा शहर पोलीस आणि नागरिकांनी शलमोनला विहीरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर घरातल्यांनी माहिती घेतली असता हे घृणास्पद कृत्य त्याचा चुलता अक्षय सोनवणे याने केले असल्याचे समोर आले.
कोवळ्या मुलाचा अत्यंत निर्दयपणे त्याने खून केल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अक्षय सोनवणे याला काही तासांत अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुलीही दिली. “माझे आईवडील माझा सख्खा भाऊ मयूर सोनवणे याच्याकडेच जास्त लक्ष देतात आणि मला नेहमी वाईट नजरेने पाहतात. याचा राग मनात धरून मी माझ्या भावाच्या मुलाला विहिरीत फेकून दिले,’ अशी खळबळजनक कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली. अक्षय सोनावणे एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करतो. तो विवाहित असून केवळ कुटुंबातील द्वेषापोटी त्याने कोवळ्या मुलाचा जीव घेतला आहे.