नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर परिसरात पिकणारा कालनमक जातीचा तांदूळ आणि मणिपूरमध्ये पिकणाऱ्या ब्लॅक राईसच्या मिश्रणातून पौष्टीक आहार तयार करण्यासंदर्भात वाराणसीतील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्रात (इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट-इरी) संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया पदार्थ उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणानेही मदत केलेली आहे. या नव्या पदार्थाला कान्फ्लेक्स असे नाव देण्यात येणार असून नेहमीच्या कॉर्नफ्लेक्सप्रमाणे ते दुधासोबत खाता येईल. आता नव्या पौष्टिक आहाराच उपयोग सर्वसामान्यांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांनाही होणार आहे.
सिद्धार्थनगरचा कालानमक तांदूळ आणि मणिपूरच्या ब्लॅक राईसच्या मिश्रणातून कॉर्नफ्लेक्सला पर्याय तयार केला जात आहे. इरी संस्थेतील संशोधक कालानमक तांदळाचा सुगंध आणि पौष्टिकतेवर संशोधन करत आहेत. याआधी कालानमक जातीच्या तांदळापासून ब्रेड आणि कुकीज करण्यात आल्या आहेत. वाराणसीतील बाजारपेठे या ब्रेडला आणि कुकीजला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता पुढील संशोधनकार्य हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे आता मक्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कॉर्नफ्लेक्सला पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये मणिपूरच्या ब्लॅक राईसमधील प्रोटीन आणि लोहाचा समावेश होणार आहे. नव्या पौष्टीक आहाराला नैसर्गिक सुगंध यावा यासाठी त्यामध्ये गूळ आणि सुकामेवा देखील मिसळण्यात येणार आहे. त्याचबरोबर कालानमक जातीच्या तांदळामुळे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे होतात याचेही संशोधन केले जात आहे.
कालानमक तांदळाची खीर बाजारात येणार
वाराणसीमधील इरी संस्था तांदळापासून आणखी काही उत्पादने विकसित करण्यावरही संशोधन करत आहे. त्यानुसार बाजारात डबाबंद खीर (कालानमक तांदूळ आणि दुधापासून बनवलेली) आणण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.
इरीमध्ये कालानमक जातीच्या तांदळावर विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. कॉर्नफ्लेक्सला पर्याय निर्माण करण्यातबाबतचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा पौष्टीक आहार बाजारात येईल. त्यानंतर लवकरच खीरदेखील बाजारात आणली जाईल.
सौरभ बदोनी, संशोधक (आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र, वाराणसी)