जाहिरातबाजीत भाजप सरकार एक नंबर

कराड – महाराष्ट्र एक नंबरवर असल्याची जाहिरात भाजपच्या माध्यमातून प्रत्येक महामार्गावर लावलेली दिसून येत आहे. पण नेमका महाराष्ट्राचा खालून की वरुन पहिला क्रमांक आहे. याची उकल सर्वसामान्य जनतेला झालेली नाही. त्यामुळे भाजप सरकार केवळ जाहिरातबाजीत एक नंबर असल्याची प्रखर टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते आ. अनंत गाडगीळ यांनी केली.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे उपस्थित होते. आ. गाडगीळ म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व देशाला दिशा देणारे असेच आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. भाजप हे भ्रष्टाचारांचे सर्वाधिक आरोप असलेले सरकार आहे.

त्यांच्यातील अनेकांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले असतानाही मुख्यमंत्री फडणवीस एक तरी भ्रष्टाचार दाखवा अशी चुकीची वक्तव्ये करीत आहेत. मेक इन इंडिया च्या नावाखाली सरकारने बाहेरील देशातील उत्पादनाचा वापर केला आहे. एक राष्ट्र एक कर ऐवजी एक राष्ट्र आठ करांची अमंलबजावणी या सरकारने केली आहे.

चांद्रयान 2 साठीची परवानगी ही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. मात्र त्यांच्या अपयशानंतर शास्त्रज्ञांवर नरेंद्र मोदी नाराज होवून बाहेर पडले होते. परंतु बाहेर लोकांच्यात चुकीचा संदेश जावू नये, यासाठी नंतर स्वतःच्या प्रसिध्दीसाठी शास्त्रज्ञ यांना धीर देतानाचे फोटो काढले आहेत. असेही प्रवक्ते गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.