अरुणाचल प्रदेशात आढळली ग्रीन पिट व्हायपरची नवी प्रजाती

मुंबई : भारतातील निसर्ग अभ्यासकांच्या एका गटाला, अरुणाचल प्रदेशमधील पख्खे व्याघ्र संवर्धन प्रकल्पात हिरव्या पिट व्हायपर या अत्यंत विषारी सापाची एक नवीच प्रजाती आढळून आली असून, या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याची माहिती, येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिली आहे. या पथकाला जुलै 2019 मधील निसर्ग संवर्धन-संशोधन पाहणीवेळी हा वेगळ्याच वैशिष्टयांचा सर्प आढळून आला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्स, बेंगळुरूचा झीशान मिश्रा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबईचे हर्षल भोसले आणि मंदार सावंत, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा गौरांग गोवंडे आणि डेहराडूनच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचा पुष्कर फणसळकर व हर्षिल पटेल अशा सहा जणांचा या अभ्यासकांच्या गटात समावेश होता. त्यांचे हे संशोधन झूसिस्टेमॅटिक्‍स अँड इव्होल्युशन या प्राणीशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे.

नेहमीचा ग्रीन पिट व्हायपर आणि नव्या प्रजातीमधल्या फरकाबद्दल सांगताना झीशान मिश्रा म्हणाले की, या नव्या प्रजातीच्या अंगावर डोक्‍यापासून ते शेपटीपर्यंत, गंजलेल्या लोखंडाप्रमाणे लाल-केशरी पट्टे दिसून येतात. तसेच या सापाचे त्रिकोणी डोकेही इतर पिट व्हायपरपेक्षा निराळे आहे. सिजोसा-बालुकपॉंग या 49 किमीच्या रस्त्यावर हा साप आम्हाला आढळून आला. अरुणाचल प्रदेशात होत असलेल्या रस्तारुंदी, धरणप्रकल्प यामुळे अनेक दुर्मिळ वन्यजीव नाहिसे होत आहेत किंवा स्थालंतर करत आहेत. त्यामुळेच सहसा या प्रदेशात न आढळणारा हा ग्रीन पिट व्हायपर आम्हाला आढळून आला.

हॅरी पॉटरमधल्या सापावरुन केले नामकरण…
कोणत्याही सजिवाची नवी प्रजाती आढळली की तिला नाव देताना सहसा संशोधक आपल्या नावातील काही भागाचा समावेश करतात. मात्र या ग्रीन पिट व्हायपरला जे. के. रौलिंगलिखित हॅरी पॉटरमधील सालाझार सायथेलीन असे नाव देण्यात आले आहे. या सापाचे शास्त्रीय नाव ट्रामेरेसुरस लॅसिपेडी असे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.