नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिका, हॉंगकॉंग आणि बोत्सवाना या देशांत करोना विषाणूचा नवा अवतार आढळला आहे. त्यावरून केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सावध केले आहे.
करोनाचा नवा अवतार चिंता वाढवणारा ठरला आहे. त्याची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. करोनाचा नवा अवतार आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या काटेकोर तपासण्या केल्या जाव्यात. त्यांच्या करोनाविषयक चाचण्या घेतल्या जाव्यात. एखादा प्रवासी करोनाबाधित आढळल्यास त्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळांकडे पाठवले जावेत. त्या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचाही तातडीने शोध घेतला जावा, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.