दिवसभरात 138 जणांना डिस्चार्ज
पुणे – करोना बाधितांच्या संख्येने रविवारी पुन्हा 271 चा आकडा गाठला आहे. दोन दिवसांच्या साधारण 1,800 सॅम्पल्स तपासणीतून या व्यक्ती सापडल्या असून, बाधितांची एकूण संख्या 6,472 वर गेली आहे. तर शनिवारी दिवसभरात 138 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
रविवारी (दि. 31) दिवसभरात 359 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर, अजूनही 1 हजार 72 नमुने तपासणी अहवाल प्रतीक्षेत असून, पुढील 24 तासांत याचा अहवाल येईल. दरम्यान, सद्यस्थितीत 2 हजार 376 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात 173 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 42 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 131 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दिवसभरात 6 जणांच्या मृत्युची नोंद झाली असून, त्यातील येरवडा येथील 65 वर्षीय महिलेचा दि. 25 मे रोजी उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा नमुने अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तर येरवडा येथील 80 वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य चौघांचा दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, कोथरूड, नानापेठ, ताडीवाला रोड आणि कसबा पेठेतील रहिवासी आहेत. ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या तिघांना पूर्वीच्या आजाराची हिस्ट्री होती.