पुणे विद्यापीठ चौकातही बहुमजली उड्डाणपूल

“पीएमआरडीए’ नोडल एजन्सी म्हणून काम करणार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील आचार्य आनंदऋषिजी चौकात महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे, तरीही येथील वाहतूक कोंडी कायम आहे. पण, अखेर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे ही कोंडी फुटणार असून त्यासाठी या चौकात बहुमजली उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे.

विद्यापीठ चौकातील प्रस्तावित बहुमजली उड्डाणपुलाचा व्यवहार्यता अहवाल पुढील आठवडाभरात तयार होणार आहे. यानंतर उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, मेट्रो मार्गिका आणि अंतर्गत वर्तुळाकार मार्ग याची चौकातील रचना कशी असेल, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी पीएमआरडीएला “नोडल एजन्सी’ म्हणून नेमण्यात आल्याने त्याचा संपूर्ण आराखड्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

शहराच्या पश्‍चिम भागातील औंध, बाणेर, बालेवाडी, वाकड, भागाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक आहे. गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि औंध, बाणेर व पाषाणकडे जाणारे रस्ते आनंदऋषिजी चौकात एकत्र येतात. या ठिकाणी उड्डाणपूल झाला असला, तरी त्याने वाहतुकीचा प्रश्‍न मिटलेला नाही. भविष्यात याच ठिकाणाहून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि महापालिकेचा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रस्तावित आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकासाठी सर्वसमावेशक नियोजन करण्यात येत असून येथे बहुमजली उड्डाणपूल उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मान्यता दिली आहे. या ठिकाणच्या प्रस्तावित बहुमजली उड्डाणपुलाच्या नियोजनासाठी बुधवारी महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत या पुलाच्या आराखड्यास त्याच्या उपयुक्ततेवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार, लवकरच या पुलाचा आराखडा अंमिम होणार आहे.

नागपूर मेट्रोसारखा होणार पूल?
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा-सिमेन्स कंपनीकडून केले जाणार असून, त्यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या चौकातील भविष्यकालीन नियोजनाचा तांत्रिक व्यवहार्यता अहवाल लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. “सध्याचा उड्डाणपूल एकेरी असल्याने तो पाडून एकाच खांबावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा,’ असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) नागपूर आणि पुण्यातही या स्वरूपाचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्याच धर्तीवर हा पूल उभारला जाण्याची शक्‍यता प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.