मोरवाडी न्यायालयापुढे समस्यांचा डोंगर

सुविधा पुरविण्याची वकिलांची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी न्यायालयामध्ये वकिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत पिंपरी चिंचवड वकील संघटेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामध्ये न्यायालय परिसरातील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 22 लाख इतकी आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी अवघे 6 ज्युनिअर डिव्हीजन, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कामाचा डोंगर उपसत आहेत. त्यामध्येही करोना विषाणूच्या संक्रमणामुळे वकिलांना काम राहिलेले नाही. त्यामुळे वकिलांची अर्थिक घडी विस्कटलेली आहे. पिंपरी न्यायालयामध्ये सुमारे 44 हजारांहून अधिक सिव्हील आणि क्रिमिनल खटले प्रलंबित आहेत. पिंपरी चिंचवडमधील पक्षकार, नागरिक गेले तीस ते चाळीस न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे पक्षकारांबरोबरच वकीलांचाही न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडत चालला आहे.

न्यायालय परिसरामध्ये महिला वकिलांसाठीही सुविधेचा अभाव आहे. महिला वकीलांसाठीची बार रूम अपुरी आहे. पावसाळ्यात स्लॅबमधील पाणी गळतीमुळे ती धोकादायक बनली आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याची याठिकाणी सोय नाही. वकील, पक्षकार, पोलीस यांच्यासाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. अपंग पक्षकारांसाठी वरील मजल्यावरील कोर्ट हॉल मध्ये जाण्याकरिता लिफ्ट, अथवा अन्य कोणतीही उपाययोजना नाही.

कोर्ट रेकॉर्ड रूमसाठी अपुरी जागा असल्याने अनेक महत्वाच्या कागदपत्रांचा ढीग न्यायालय हॉलमध्ये धुळ खात पडला आहे. वकील, पक्षकार यांना न्यायालय हॉलमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा व बैठक व्यवस्था उपलब्ध नाही. यासारख्या अनेक समस्यांनी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाची इमारत ग्रासलेली आहे. त्याचा त्रास न्यायलयामध्ये येणारे नागरिक व वकील यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवड वकील संघटनेने केली आहे.

धोकादायक जागेवर इमारत
मोरवाडी न्यायालयाची इमारत डी. पी. रस्त्याचे साईड मार्जिन न सोडता बांधलेली आहे. प्रवेशद्वारासमोरिल दुतर्फी रस्त्याच्या वळणामुळे अनेकदा सरळ भरधाव वेगाने वाहने आतमध्ये येतात. वाहनांवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे न्यायालय इमारतीत व प्रवेशद्वारावर अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे 1200 पेक्षा अधिक सभासद आहेत. पिंपरी न्यायालयामध्ये साधारण परिस्थितीत रोज वकील, पक्षकार, पोलीस, आरोपी, जामिनदार इत्यादी सुमारे 700 पेक्षा जास्त नागरिक न्यायालयीन कामासाठी येत असतात. पिंपरी न्यायालयाची इमारत जुनी असून भिंतीवर झाडे उगवल्याने जीर्ण होत आहे. कोर्टाची इमारत व परिसर कोर्ट कामकाजासाठी अनेक वर्षांपासून अपुरा पडत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.