Baramati News | बारामतीत आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर;पुत्रशोकानंतर वडिलांचा २४ तासांत मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती शहरात खंडोबानगर चौकात रविवार (दि.२७) रोजी ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बाप- लेकींचा मृत्यू झाला. पुत्रशोकातून अद्याप कुटुंब सावरले नसताना २४ तासांतच वडिलांनी अखेरचा निरोप घेतला. या घटनेने कुटुंबातील कर्ता आधार नियतीने हिरावून नेला आहे. संपूर्ण बारामती आणि इंदापूर शहरावर शोककळा पसरली आहे.राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०), असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे.
ओंकार याचे वडील राजेंद्र आचार्य (वय ७०) यांना ऑटिझम व शुगर होती. एक महिन्यापासून ते बारामती हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडले होते. वडिलांना फळे घेऊन येण्यासाठी ते सई आणि मधुरा हिला दुचाकीवरून घेऊन गेले होते. शहरातील खंडोबानगर चौकात रविवारी (दि.२७) रोजी दुपारी बाराच्या सुमारास ओंकार हे आपल्या मुलींना घेऊन घरी येत होते.हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील ओंकार राजेंद्र आचार्य व त्यांच्या मुली सई व मधुरा या तिघांचा मृत्यू झाला.
संपूर्ण शहरावर शोककळा पसरली होती. बाप- लेकींचा मृत्यू हा सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला होता. नियतीने ओंकार यांच्या मृत्यूने पुत्रशोक करण्याची वेळ आली. शवविच्छेदनानंतर शोकाकूल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मुलगा व नातींच्या मृत्यूचा धक्क्यातून आचार्य कुटुंब सावरले नव्हते. आई- वडिल, पत्नी अद्याप सावरले नव्हते. त्यानंतर मुलगी- नातींचा मृत्यू होऊन २४ तासही उलटले नव्हते. मुलगा आणि नातींच्या मृत्यू धक्का सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी ओंकार यांच्या वडिलांनी देखील प्राण सोडले.
कुटुंबातील कर्ता आधारच संपला
आचार्य कुटुंबावर एका पाठोपाठ तीन धक्के बसले आहेत. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे बारामती शहरावर शोककळा पसरली आहे. सुखी- समाधानी आचार्य कुटुंब, आई- वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या ओंकारचा मृत्यू हृदय हेलावणारा होता. घरांपासून अवघ्या २०० फुटांवर असलेल्या ओंकारला मृत्यूने कवटाळले. हा धक्का कुटुंबाला वेदनादायक होता. २४ तासांत मुलगा, दोन नाती आणि वडिल, अशा चौघांच्या मृत्यूंचा आघात कुटुंबावर कोसळला आहे. या घटनेमुळे बारामती शहरावर शोककळा पसरली आहे.





