भुलेश्‍वर घाटात दरड कोसळली

चाऱ्या तुंबल्या, पावसाचे पाणी रस्त्यावर

भुलेश्‍वर : पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस व दौंड तालुक्‍यातील यवत या दोन गावांना जोडणारा भुलेश्‍वर घाटात दोन दिवस झाले पाऊस सुरू असल्याने दरड कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ व घाटातून प्रवास करणारे प्रवासी नसल्यामुळे जीवित हानी घडली नाही.

रविवारी (दि. 26) सकाळी या घाटातून प्रवास करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी घाटामध्ये येणाऱ्या प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेले दगड उचलून बाजूला टाकून स्वच्छता केली.

मध्यतरी भुलेश्‍वर घाटाचेही रुंदिकरण करण्यात आले. मात्र, हा घाट सुरुवाती पासुनच पुरंदर व दौंड तालुक्‍याच्या वन विभागाच्या कात्रीत सापडला. कामाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही तालुक्‍याच्या हद्दीमध्ये हे काम वनविभागाने बंद केले. यामुळे या घाटाचे सुरुवाती पासुनच अनेक अडथळे आले. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर सरळ तोडण्यात आला. यामुळे उन्हाने डोंगर तापुन पावसाळ्यात तो भिजला जावून सध्या ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत.

पाणी वाहून जाणाऱ्या चारीमध्ये डोंगराची दगड माती पडल्याने चारी ठिकठिकाणी बुजल्या आहेत. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. यामुळे अनेक ठिकाणी नुकताच झालेला घाट रस्ता खराब होण्याची शक्‍यता आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार तरी केव्हा हा प्रश्‍न या घाटातून प्रवास करणाऱ्या घाटाच्या वरील बाजूला असणाऱ्या परिसरातील ग्रामास्थांना पडला आहे.

दरम्यान, करोनामुळे यंदाची श्रावण यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे येथे या घाटातून येणारे पर्यटक जरी नसले तरी या भुलेश्‍वर घाटाच्या वर असणाऱ्या माळशिरस, टेकवडी, पोंढे यांना यवत या गावी दळणवळण करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे म्हणून तुंबलेल्या चाऱ्या लवकरात लवकर मोकळ्या कराव्या, अशी मागणी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी केली आहे. रविवारी त्यांनी भुलेश्‍वर घाटाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळकृष्ण गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायकवाड उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.