ना ईज्जत दे ना अजमत दे
ना सुरत दे ना सिरत दे
मेरे वतन के वास्ते
ये रब मुझे मरने कि सिर्फ हिम्मत दे
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असंख्य शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ज्यामुळे आज आपण आनंदाने स्वतंत्र म्हणून जगतोय! या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगणित तरूणांनी हौतात्म्य पत्करले. यातीलच एक नाव म्हणजे हुतात्मा भगतसिंग. केवळ 23 वर्ष 5 महिने आणि 25 दिवसांचे आयुष्य त्यांना लाभले. मात्र, या अल्पशा आयुष्यात त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करीत, येणाऱ्या पिढ्यांना प्रेरक असे कार्य पाठीमागे ठेवले आहे. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला. घरामध्ये असणाऱ्या क्रांतिकारी वातावरणाने त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले. आपण आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी
काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांनी बालपणापासून जपला होता. जालियनवाला बाग हत्याकांड आणि इंग्रज भारतीयांवर करीत असलेला अत्याचार पाहून, त्यांनी आपण याचा विरोध कृतीच्या माध्यमातून करायचा असे ठरविले. महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांचे सर्व मित्र पण क्रांतीच्या विचाराने प्रेरित होते. या सगळ्यांना सोबत घेऊन संघटना निर्मितीचे कार्य त्यांनी केले. नवजवान भारत सभेची त्यांनी स्थापना केली. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये त्यांनी काम करून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. या सर्वांचे अंतिम ध्येय इंग्रजांच्या गुलामीतून मुक्तता हेच होते.
भगतसिंग यांना वाचनाची प्रचंड आवड होती. उपलब्ध वेळेचा पुरेपूर वापर त्यांनी केला. सचिंद्रनाथ संन्याल, ऑस्कर वाइल्ड, मॅझिनी, मार्क्स, गरीबॉल्डी, रूसो, बकुनीन, लेनिन, टॉलस्टाय अशा असंख्य लेखकांची पुस्तके त्यांनी वाचली होती. वाचन आणि तत्कालीन स्थितीचे अवलोकन करून लिखाण हे सातत्यपूर्ण चालू होते. त्यांचे संपूर्ण लिखाण आज उपलब्ध नाहीये. बम और पिस्तोल से क्रांती नही आती, क्रांती की तलवार विचारों की सान पर तेज होती है म्हणत त्यांनी आपल्या विचारातील स्पष्टतेतून तरूणांचे संघटन केले. स्वत: अविवाहित राहण्याचा निर्णय घेत, संपूर्ण वेळ स्वातंत्र्य चळवळीसाठी देण्याचे त्यांनी ठरविले. चंद्रशेखर आझाद, अश्फाकउल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त अशा असंख्य क्रांतीविरांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या पक्षाने अन्यायकारक विधेयकाचा निषेध करण्यासाठी केंद्रीय विधिमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे ठरविले. सभागृहात बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी 8 एप्रिल 1929 रोजी बॉम्ब टाकले. जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी हा मोठा आवाज केला आहे अशी निषेध पत्रके उधळत, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. हे सगळे पूर्वनियोजित होते.
समकालीन स्थितीमध्ये महापुरुषांची आठवण आपल्याला ही केवळ त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीलाच येत आहे. तरूण देश म्हणून असणारी आपली ओळख खऱ्याअर्थाने जगासमोर मांडायची असेल तर महापुरूषांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. जिंदगी अपने दम पर जी जाती है दुसरों के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है असे म्हणणारे भगतसिंग 23 मार्च 1931 रोजी हसत हसत फासावर गेले. त्यांनी आपल्या अत्युच्च बलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक प्रखर बनविला. देशामध्ये राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या सशस्त्र क्रांतिवीरांना त्यांच्या बलिदानदिनी विनम्र अभिवादन. इन्कलाब जिंदाबाद.