पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा पाच टीएमसी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांत दिड टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
हा पाणीसाठा शहराला महिनाभर पुरेल एवढे आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रा सोबतच घाटमाथ्यावर पावसाचा जोर असल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये २६ जून या दिवशी ३.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. हा साठा बुधवारी (दि.३) सायंकाळी ४.९९ टीएमसी झाला आहे.
खडकवासलासह चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर, बुधवारी पहाटे तसेच दिवसभरातही चांगला पाऊस झाला.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी दिवसभरात सर्वाधिक ५३ मिमी पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला. तर, पानशेत धरणात ३१ मिमी, वरसगाव धरणात २९ मिमी पावसाची नोंद झाली तर खडकवासला धरणात अवघा २ मिमी पाऊस झाला आहे.
मात्र, घाटमाथ्यावरील पावसाने धरणात मोठया प्रमाणात पाणी येत असल्याने पाणीसाठा वेगाने वाढत आहे. मागील वर्षी याच दिवशी या चारही धरणांमध्ये सुमारे ५.९९ टीएमसी पाणासाठा होता त्या साठ्यापेक्षा यंदा एक टीएमसी कमी पाणी आहे.
धरणातील पाणीसाठा आणि पाऊस
धरणाचे नाव……. पाणीसाठा…………….. पाऊस
– खडकवासला……….०.८५ टीएमसी……….२ मिमी
– वरसगाव……………१.४० टीएमसी…………२९ मिमी
-पानशेत………………२.४५ टीएमसी………….३१ मिमी
– टेमघर………………..०.३० टीएमसी………….५७ मिमी