गाळप परवाना अर्जासाठी महिनाभर मुदतवाढ

अतिवृष्टीचा फटका : हंगामावर दाट परिणाम होण्याची शक्‍यता

पुणे – अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या गळीत हंगामावर त्याचा परिणाम होणार असल्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामसाठी महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व कारखाने दि. 30 सप्टेंबरपर्यंत गळीत हंगामासाठी साखर आयुक्‍तालयाकडे अर्ज सादर करू शकणार आहेत.

राज्याच्या एका भागात पूर तर दुसऱ्या भागात दुष्काळी स्थिती अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उसाचे पीक धोक्‍यात आले आहे. या दोन्ही संकटांमुळे साखर कारखान्यांचे यंदाच्या गळीत हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील साखर कारखान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यंदाच्या गळीत हंगामाकरिता 30ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत जाहिर करण्यात आली होती. मात्र, राज्यातील दोन्ही ठिकाणच्या कारखान्यांना या अडचणींमुळे परवाना घ्यायला वेळच मिळालेला नाही.

दुष्काळामुळे मराठवाड्यातील पैकी सुमारे 40 कारखान्यांकडून गळीत हंगाम घेण्याची शक्‍यता नाही. त्याचा परिणाम मराठवड्यातील कारखान्यांच्या साखर उत्पादनावर होणार आहे. गळीत हंगामाकरिता साखर प्रादेशिक संचालकांकडे अर्ज सादर करावयाचा असतो. सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर मंजुरीसाठी अर्ज साखर आयुक्‍तांकडे पाठविला जातो. यंदाच्या हंगामासाठी राज्यातून केवळ एका साखर कारखान्याचा अर्ज सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.